Wednesday, January 5, 2011

मुंबईच्या ग्रीनपॅचकडे पक्ष्यांची पाठ

प्रशांत सिनकर
हिवाळ्यात कर्नाळा किंवा राजस्थानातील भरतपूर येथील जंगलात पक्षीनिरीक्षणासाठी अनेक पर्यटक जातात, परंतु या दिवसांत कधी काळी मुंबईत सुमारे 350 प्रकारच्या जातीच्या पक्ष्यांचा वावर होता, असं कुणाला सांगितलं तर त्यांचा विश्वास बसणार नाही.
मुंबई- हिवाळ्यात कर्नाळा किंवा राजस्थानातील भरतपूर येथील जंगलात पक्षीनिरीक्षणासाठी अनेक पर्यटक जातात, परंतु या दिवसांत कधी काळी मुंबईत सुमारे 350 प्रकारच्या जातीच्या पक्ष्यांचा वावर होता, असं कुणाला सांगितलं तर त्यांचा विश्वास बसणार नाही. युरोप, आफ्रिका, आशिया खंडातील अनेक स्थलांतरीत पक्षी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी, विक्रोळी पार्कसाइट, दादर हिंदू कॉलनी, आयआयटी पवई, मलबार हिल, रेसकोर्स, राणीबाग इत्यादी भागात सहज दिसत होते, परंतु वाढत्या शहरीकरणामुळे स्थलांतरीत पक्षी येण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. इथल्या ‘ग्रीनपॅच’ संवर्धनाबरोबर आंबा, पिंपळ, उंबर, वड अशा झाडांची लागवड करून त्यांची जोपासना केली तर बोर्डीमैना (रोझिस्टार्लिग), वॉरब्लेर्स, स्टेफी इगल, ग्रेटर स्पोटेल इगल, पॅरोहॉक, फाल्कनसारखे युरोप आणि सैबेरियातील पक्षी मुंबापुरीच्या दिशेने कूच करतील, असा विश्वास पक्षीप्रेमींकडून व्यक्त केला जातो.
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे कॉलनी हा परिसर बघितल्यानंतर पूर्वीची मुंबापुरी कशी होती, याची कल्पना येते. तेव्हा इथे स्थानिक पक्ष्यांबरोबर स्थलांतरीत पक्षी येण्याचे प्रमाणही मोठे होते. आफ्रिका, युरोपमधील अनेक पक्षी हिवाळ्यात येथे दाखल दाखल होतात. मात्र स्थलांतरीत पक्षी येण्याचे प्रमाण कमी होत असल्याचा अंदाज पक्षीमित्रांकडून व्यक्त होतो. नोव्हेंबर महिन्यात थंडीची चाहूल लागताच या महिन्यामध्ये स्थलांतरीत पक्षी येण्याचा मौसम सुरू होतो. मात्र इथल्या बदलत्या हवामानामुळे हे पक्षी मुंबईत उशिराने दाखल होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी आता गुलाबी थंडीत झाडांवर दिसणारे अनेक स्थलांतरीत पक्षी दिसेनासे झाले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी, विक्रोळी पार्कसाइट, दादर हिंदू कॉलनी, आयआयटी पवई, मलबार हिल, रेसकोर्ससारख्या ‘ग्रीनपॅच’ भागात अनेक प्रकारचे स्थलांतरीत पक्षी दिसतात. परंतु दरवर्षीच्या प्रमाणात त्यांच्या संख्येत घट झाली असल्याचा अंदाज पक्षीतज्ज्ञ आदेश शिवकर यांनी व्यक्त केला आहे.
पावसाळा आला की, मुंबापुरीत झाडे लावण्याचा सपाटा सरकारी आणि सामाजिक संस्थांकडून सुरू होतो. परंतु लावलेली झाडं इथल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी फायदेशीर आहेत का, याचा कोणी विचार करत नाही. मुंबईत झटपट श्रीमंत होण्यासाठी येणाऱ्यांचा लोंढा जसा वाढला आहे, तशी झटपट वाढणाऱ्या गुलमोहरसारख्या झाडांची संख्या वाढली आहे. परंतु अशा झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, याची शाश्वती नाही. खरं तर इथल्या वातावरणानुसार येथे वड, पिंपळ, उंबर, आंबा अशी झाडं लावली पाहिजेत. या झाडांची वाढ थोडी उशिराने होत असली तरी ती झाडं पक्ष्यांच्या संवर्धनासाठी महत्त्वाची असतात. हिवाळ्यात आपल्याकडे दोन प्रकारचे पक्षी येतात. एक म्हणजे समुद्रकिनारी आणि दुसरे ‘ग्रीनपॅच’ परिसरात वावरणारे. या ग्रीनपॅचमध्ये मध्य भारताबरोबर आशिया, आफ्रिका आणि युरोपातून पक्षी येतात. सर्वसाधारण पूर्वी मुंबईत सुमारे 350 प्रकारचे पक्षी हिवाळ्यात आढळत होते. त्यापैकी 35 ते 40 टक्के स्थलांतरीत पक्षी होते. आता ग्रीनपॅचमध्ये पक्ष्यांच्या केवळ 30 ते 40 जातीच दिसतात. बोर्डीमैना (अफगाणिस्तान), वॉरब्लेर्स (सैबेरिया), हळद्या (मध्य भारत) असे काही पक्षी दिसत होते, परंतु त्यांचं दिसणं आता दुर्मीळ झालं आहे. भारतात परदेशातून शिकारीसाठीही काही पक्षी येतात. त्यामध्ये बहिरी ससाणा, स्टेफी इगल, ग्रेटर स्पोटेल इगल, पॅरोहॉक, फाल्कनसारखे युरोप आणि सैबेरियातील पक्षी दाखल होत असत. एकूण, मुंबईतील पर्यावरण पूर्वी खूप चांगलं होतं, मात्र वाढत्या शहरीकरणाच्या नादात इथला निसर्ग हरवत चालला आहे. इथल्या पर्यावरणाचं ख-या अर्थाने संवर्धन करायचं असेल तर इथले शिल्लक असलेले ग्रीनपॅच सुरक्षित ठेवले पाहिजेत. शिवाय नवीन ग्रीनपॅच तयार करण्यासाठी स्थानिक झाडांनाच प्राधान्य दिलं पाहिजे, असे पक्षीतज्ज्ञांचे मत आहे.